मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची कामगिरी
मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना जादा पैशांचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा मुक्ताईनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. १ लाख रुपयांच्या बदल्यात १० लाख रुपयांचे बनावट चलन देण्याचे प्रलोभन दाखवणारे ‘रिल्स’ सोशल मीडियावर प्रसारित करून लोकांची दिशाभूल करणाऱ्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.


मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा येथील रहिवासी असलेले संशयित आरोपी शिवकुमार शमी भोसले, देवकुमार शिवराज भोसले आणि सुजिता उर्फ सुजाता शिवकुमार भोसले या तिघांनी संगनमत करून फसवणुकीचा कट रचला होता. त्यांनी फेसबुकवर ‘Saawariya Set’ नावाचे एक प्रोफाईल तयार केले होते. या प्रोफाईलवरून तसेच इंस्टाग्राम आणि इतर समाज माध्यमांवर त्यांनी काही व्हिडिओ (रिल्स) अपलोड केले होते. या व्हिडिओंमध्ये “एक लाख रुपये द्या आणि त्या बदल्यात दहा लाख रुपये मिळवा” असे आमिष दाखवण्यात आले होते. हे पैसे बनावट चलनी नोटांच्या स्वरूपात देऊन लोकांची आर्थिक फसवणूक करण्याचा या टोळीचा मुख्य उद्देश होता.
हा प्रकार मुक्ताईनगर पोलिसांच्या निदर्शनास येताच, पोलीस कॉन्स्टेबल सागर राजू सावे यांनी फिर्याद दिली. या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगाने हालचाली करत २५ डिसेंबर रोजी या संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी देवकुमार शिवराज भोसले व सुजिता उर्फ सुजाता शिवकुमार भोसले यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींच्या ताब्यातून “CHILDREN BANK OF INDIA – पाचशे रुपये” असे लिहिलेल्या एकूण १०६५ बनावट कागदी नोटा तसेच ५ अँड्रॉईड मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, सहा. पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे, पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील व मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे.









