जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत पुढील तीन दिवस महत्त्वाचे
जळगाव ( विशेष प्रतिनिधी ) – जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गेल्या तीन दिवसांपासून नामनिर्देशन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक प्रभागामध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड असून तब्बल हजाराच्या वर अर्ज विक्री झाली आहेत. दुसरीकडे भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढेल असे चित्र असताना मात्र घाईघाईत भाजप सेना युतीची घोषणा झाली. यामुळे आगामी काळात बंडखोरी व पक्षांतर वाढणार असल्याची माहिती दोन्ही पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिली आहे.

जळगाव शहर महानगरपालिकेची २०१८ साली निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक ५७ जागा जिंकले होत्या. मात्र तरी देखील अडीच वर्षांनी नगरसेवक फुटून शिवसेना ठाकरे गटाची सत्ता आली होती. ७५ जागांपैकी भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गटाला पंधरापेक्षा अधिक जागा सोडू शकत नाही अशी परिस्थिती आहे. अन्यथा भाजपचे संख्याबळ नक्कीच घटणार आहे. दुसरीकडे महायुतीमधील तिसरा घटक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मात्र स्वबळाच्या दिशेने वाटचाल करत आहे.
भाजप सेना युतीची घोषणा राष्ट्रवादी अजित पवार गटाला अजिबात विश्वासात न घेता करण्यात आली. याचाच अर्थ शिवसेना शिंदे गटातील नेत्यांवर भाजपाकडून दबाव वाढविला जात असून प्रतिस्पर्धी कमजोर करण्यासाठी भाजप खेळी करत आहे. त्यात शहरांमध्ये आता अनेक प्रभागांमध्ये परिवर्तनाचे वारे असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार व शरद पवार अशा दोन्ही गटाकडून तसेच शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस पक्ष यांच्याकडून तरुण तडफदार आणि निस्वार्थी जनसेवा करीत असलेले कार्यकर्त्यांना तिकीट देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
केवळ नामवंत लोक आणि धनवान लोकांना तिकीट वाटप करण्याऐवजी जे प्रभागांमध्ये लोकप्रिय आहेत अशांना तिकीट देण्याकडे या चारही पक्षांचा कल दिसत आहे. दोन दिवसात काही पक्षांची यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर पक्षांतर व बंड दिसून येईल. सेना-भाजप युतीमुळे अनेक विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापले जाणार आहे. यामुळे पुढील तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.









