वकील संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी
अमळनेर ( प्रतिनिधी ) – येथील वकील अॅड. मंगेश देविदास पाटील यांना एका कायदेशीर नोटीस प्रकरणात फोनवरून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी अमळनेर वकील संघाने तीव्र निषेध नोंदवित वकील संरक्षण कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

अमळनेर वकील संघाचे सदस्य असलेले अॅड. मंगेश देविदास पाटील यांनी एका प्रकरणात कायदेशीर नोटीस बजावली होती. त्यानंतर दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे २.४७ वाजता प्रदीप राज कुलकर्णी (रा. शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी अॅड. पाटील यांना फोन करून अरेरावीची भाषा वापरत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अॅड. पाटील हे त्यावेळी न्यायालयात कामकाज करत होते, असेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकारानंतर अॅड. मंगेश पाटील यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून, या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमळनेर वकील संघाने दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी तातडीची बैठक घेऊन घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. अशा प्रकारच्या धमक्यांमुळे वकिलांना निर्भयपणे आपले कर्तव्य पार पाडणे कठीण होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यात वकिलांवरील हल्ले व धमक्यांचे प्रकार वाढत असल्याने वकील संघटनांकडून राज्य व केंद्र सरकारकडे वकील संरक्षण कायदा त्वरित लागू करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. मात्र, अद्याप या कायद्याची अंमलबजावणी न झाल्याने वकील वर्गात नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, अमळनेर वकील संघाने संबंधित व्यक्तीवर कायद्यानुसार ठोस कार्यवाही करावी तसेच वकील संरक्षण कायदा तातडीने लागू करून वकिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.









