४०३ ग्रामपंचायतींना बसला ‘तिसरा डोळा’
जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान मोठ्या प्रमाणावर प्रभावीपणे राबविण्यात येत असून, या अभियानांतर्गत ग्रामपंचायती समृद्ध व अधिक सक्षम करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. याच उपक्रमांचा एक महत्त्वाचा भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या दूरदृष्टीतून ग्रामपंचायत कार्यालये तसेच गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.या मोहिमेत जिल्ह्यात ३४.७४ टक्के ग्रामपंचायती सीसीटीव्हीच्या नजरेत आल्या आहेत.


मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत ग्रामपंचायती डिजिटल करणे, ग्रामपंचायतीमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा व सुविधा ऑनलाईन करणे, गावात जलतारा व शोषखड्डे तयार करून पाणी जिरविणे, वनराई बंधारे बांधणे, तसेच ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन मिळवून देणे असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालये व ग्रामपंचायत हद्दीत सुरक्षितता आणि पारदर्शकता वाढविण्याच्या उद्देशाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील एकूण ११६० ग्रामपंचायतींमध्ये हे अभियान सुरू असून, आतापर्यंत ४०३ ग्रामपंचायत कार्यालये व ग्रामपंचायत हद्दीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील ३४.७४ टक्के ग्रामपंचायती या सीसीटीव्हीच्या ‘तिसऱ्या डोळ्या’च्या नजरेत आल्या आहेत.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे ग्रामपंचायत कार्यालयातील कामकाजावर प्रभावी देखरेख राहणार असून, गावातील सुरक्षितता वाढण्यास तसेच गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे. आगामी काळात उर्वरित ग्रामपंचायतींमध्येही टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या विषयावर बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल म्हणाल्या की,“मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामपंचायती अधिक सक्षम, पारदर्शक व सुरक्षित करणे हा आहे. ग्रामपंचायत कार्यालये व ग्रामपंचायत हद्दीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यामुळे कामकाजात पारदर्शकता वाढेल, नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होईल तसेच गावपातळीवर सुरक्षिततेला बळ मिळेल.
सध्या जिल्ह्यात ३४.७४ टक्के ग्रामपंचायतींमध्ये सीसीटीव्ही व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली असून, उर्वरित ग्रामपंचायतींमध्येही ही सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून ग्रामपंचायती अधिक स्मार्ट, उत्तरदायी व लोकाभिमुख करण्याच्या दिशेने जिल्हा परिषद सातत्याने प्रयत्नशील आहे.
तालुकानिहाय सीसीटीव्ही बसविलेल्या ग्रामपंचायतींची संख्या
जामनेर-९५
मुक्ताई नगर-२९
रावेर-४५
भुसावळ-१६
धरणगाव-३०
भडगाव-१९
परोळा-२९
चोपडा-३०
यावल-२२
जळगाव-२२
अमळनेर -३५
एरंडोल-११
पाचोरा-२०









