शासकीय परिचर्या महाविद्यालय, जळगाव येथे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव संलग्नित शासकीय परिचर्या महाविद्यालयातील बीएससी नर्सिंगच्या पहिल्या बॅचचा ‘लॅम्प लाइटिंग’ आणि शपथविधी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. प्रथम वर्षात नवप्रवेशित ९७ विद्यार्थ्यांनी यावेळी मानवतेच्या सेवेची शपथ घेतली.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी सरस्वती देवी आणि नर्सिंग क्षेत्राच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोलंके, विशेष अतिथी म्हणून गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या प्रा. विशाखा गणवीर आणि प्रा. पियुष वाघ उपस्थित होते.प्राचार्य डॉ. पुष्पेंद्र निकुंभ त्यांनी विद्यार्थ्यांना सेवा, करुणा आणि प्रामाणिकपणाची शपथ दिली. अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी, “नर्सिंग हा केवळ व्यवसाय नसून ती एक पवित्र जबाबदारी आहे,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
नर्सिंग क्षेत्राची धुरा सांभाळणाऱ्या या भावी योद्ध्यांनी फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या साक्षीने रुग्णसेवेची आणि निष्ठेची शपथ घेतली. या सोहळ्याला डॉ. महादेव गायकवाड (उपप्राचार्य), डॉ. हितेश अड्चित्रे, डॉ. विलास मालकर, अधिसेविका संगीता शिंदे, सहायक अधिसेवक तुषार पाटील, प्राचार्य कविता नेतकर, बबीता वैद्य, अक्षय आणि नीलेश तेली यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्नील पीठलोड व प्रा. रेबेका लोंढे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सागर मसने यांनी मानले.









