पाचोरा तालुक्यात वडगावजवळ घटना
पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा आगारातून ५० प्रवाशी आणि शालेय विद्यार्थ्यांना घेऊन वडगावच्या दिशेने निघालेल्या एसटी बसला अपघात झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरने कट मारल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात घसरली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालकाला जखम झाली आहे.

सोमवारी २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता बस क्रमांक (एमएच १४ बीटी २६११) पाचोरा स्थानकातून निघाली होती. मोंढाळे ते निंभोरी गावांच्या दरम्यान, माजी सरपंच मीनाक्षी दिवटे यांच्या शेताजवळ ही घटना घडली. समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने बसला जोरात कट मारला. रस्ता अरुंद असल्याने आणि पाचोरा ते सातगाव (डोंगरी) रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे साईड पट्टीवर टाकलेल्या कच्च्या मातीमुळे बसचा चाक घसरले आणि बस खड्ड्यात शिरली.
अपघात घडताच मोठा आवाज झाला आणि बसमधील विद्यार्थी ओरडू लागले. ही दृश्ये पाहताच स्थानिक ग्रामस्थांसह तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. बसच्या काचा फोडून अडकलेल्या ५० प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले. या धडकेत बसच्या चालकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.घटनेची माहिती मिळताच पाचोरा आगार व्यवस्थापक प्रकाश पाटील यांनी पथकासह घटनास्थळी पोहोचून प्रवाशांची विचारपूस केली. रस्त्याच्या कामामुळे पसरलेल्या मातीमुळे चालकाला बस सावरताना अडचण आल्याचे प्राथमिक दर्शनी समोर आले आहे. क्रेनच्या साहाय्याने बसला खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास विस्कळीत झाली होती.









