पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे रंगला जुन्या मित्रांचा स्नेहमेळावा
पाचोरा (प्रतिनिधी) :- काळाच्या ओघात विखुरलेले मित्र जेव्हा पुन्हा एकत्र येतात, तेव्हा तो क्षण केवळ आनंदाचाच नाही तर आठवणींचा अनमोल ठेवा ठरतो. असाच एक अविस्मरणीय स्नेहमिलन सोहळा नांद्रा येथे २१ डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला. १९९५ ते २००५ या दशकात सोबत शिक्षण घेतलेल्या आणि बालपण गाजवलेल्या मित्रपरिवाराने या निमित्ताने पुन्हा एकदा मैत्रीचा हुंकार भरला.

या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे, आज विविध क्षेत्रांत यशस्वी झालेले हे मित्र पुन्हा एकदा ‘मैदान’ गाजवण्यासाठी एकत्र आले. दिवसभर क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. बॅट आणि बॉल हातात घेतल्यावर सर्वांचेच चेहरे बालपणीच्या आठवणींनी उजळून निघाले होते. या मित्रपरिवारात आज कोणी देशाच्या सीमेवर रक्षण करणारा सैनिक आहे, तर कोणी डॉक्टर, व्यावसायिक, शिक्षक आणि पत्रकार म्हणून समाजात आपली ओळख निर्माण केली आहे.
केवळ आनंद साजरा न करता या मित्रपरिवाराने सामाजिक भानही जपले. आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांनी आप्पासाहेब पी. एस. पाटील माध्यमिक विद्यालय, नांद्रा येथील वसतिगृहातील मुलांना क्रिकेट साहित्याची भेट दिली. आपल्याच शाळेतील लहान भावंडांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवून या मित्रांनी खऱ्या अर्थाने स्नेहमिलन सार्थकी लावले.
या सोहळ्याला योगेश बागुल, विकास खैरनार, महेश गवादे, सुपडू पाटील, अभय भावे, भैय्या फौजी, गफा फौजी, पंकज फौजी, प्रवीण फौजी, दिलीप नाना, बंडू पाटील, बाळू पाटील, मुन्ना गोरख पाटील, दिनेश करंगी, सपकाळे कॉलनी मित्र, देवरे कॉलनी मित्र, सागर तावडे, अनिल तावडे, पंकज बाविस्कर, छोटू कुंभार, राहुल नगराज, शिवाजी तावडे, विनोद मामा, संजय पावणे ताडे, पिंटू खैरनार, भोला बाविस्कर, यशवंत पवार, नवागाव भाचा आणि पंकज सर या मित्रांची प्रमुख उपस्थिती होती. “शाळा सुटली तरी मैत्रीची नाती अजूनही तितकीच घट्ट आहेत, हेच या सोहळ्याने सिद्ध केले.” अशी भावना यावेळी उपस्थित सर्वांनी व्यक्त केली.









