चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथील घटना
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील हिरापूर गावात दारूच्या नशेत असलेल्या मुलाने आपल्या आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. २० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास हेमंत लहू काळे (रा. नाशिक) हा दारू पिऊन एका अनोळखी इसमासोबत आपल्या आई कमलबाई लहू काळे (वय ७०) यांच्या हिरापूर येथील घरी आला. यावेळी त्याने वाद घालून फिर्यादीच्या पतीस रॉकेल टाकून मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच घरातील खुर्ची व हातातील काठीने मारहाण करून गंभीर दुखापत केली. भांडण सोडविण्यासाठी फिर्यादीचे पती पुढे आले असता, आरोपीने त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर “तू मेलीस पाहिजे” असे म्हणत आरोपीने आईचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
घटनेदरम्यान फिर्यादीच्या भावाचा मुलगा गणेश नारायण मराठे व सत्यभामा दगा मराठे हे दोघे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी फिर्यादी व तिच्या पतीस आरोपी व अनोळखी इसमाच्या तावडीतून सोडविले. या घटनेत जखमी झालेल्या कमलबाई काळे यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले आहे.
त्यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल राजपूत हे करीत आहे.









