भाजपचे डॉ. नरेंद्र ठाकूर नगराध्यक्षपदी, तर नगरसेवक पदावर शिंदे सेनेचे वर्चस्व


एरंडोल, (प्रतिनिधी) : येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपचे डॉ. नरेंद्र धुडकू ठाकूर यांनी ९२९४ मताधिक्य मिळवत ऐतिहासिक विजय संपादन केला. विशेष म्हणजे, या निवडणुकीत ठाकूर दाम्पत्याने विजयाची मोहोर उमटवली असून डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्या पत्नी डॉ. गीतांजली ठाकूर या देखील प्रभाग क्रमांक २ ‘अ’ मधून नगरसेवक पदासाठी विजयी झाल्या आहेत.


शिंदे सेनेचे नगरसेवक पदावर वर्चस्व..
नगराध्यक्षपद भाजपकडे गेले असले तरी, नगरसेवक पदांच्या शर्यतीत शिंदे सेना पक्षाने बाजी मारली आहे. नगरपालिकेतील २३ जागांपैकी शहराच्या विविध प्रभागांतून शिंदे सेनेचे ११, भाजपचे ४ तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ३ उमेदवार निवडून आल्याने नगरपालिकेत शिवसेना पक्षाचे स्पष्ट वर्चस्व दिसून येत आहे. या निकालाचा थेट परिणाम आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवर होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

मतमोजणी आणि निकाल..
म्हसावद रस्त्यावरील इनडोअर स्टेडियममध्ये २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रदीप पाटील आणि मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबवण्यात आली. सर्व निकाल जाहीर होताच स्टेडियमबाहेर समर्थकांनी एकच गर्दी केली होती.


विजयाचा जल्लोष आणि बंदोबस्त..
निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी ढोल-ताशांच्या गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा केला. संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान पोलीस निरीक्षक नीलेश गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही.











