मुंबईत उपचार सुरू असताना हृदयविकाराचा झटका, वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात गेल्या साडेतीन दशकांपासून आपल्या वैद्यकीय सेवेचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ फिजिशियन डॉ. संजय दत्तात्रय महाजन वय ६० यांचे आज पहाटे ४ वाजता मुंबईत उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने जळगावमधील वैद्यकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
डॉ. संजय महाजन यांनी गेल्या ३० वर्षांपासून जळगाव शहरात अविरतपणे वैद्यकीय सेवा दिली. एक निष्णात फिजिशियन म्हणून त्यांचा मोठा नावलौकिक होता. केवळ उपचार करणे एवढ्यापुरते मर्यादित न राहता, रुग्णांना धीर देणारा एक आपुलकीचा डॉक्टर अशी त्यांची ख्याती होती.
ख्वाजामिया चौकाजवळ असणाऱ्या प्रताप नगरातील त्यांच्या श्री दत्त नर्सिंग होम या दवाखान्यात अनेक गुंतागुंतीच्या आजारांच्या निदानात त्यांचा हातखंडा होता. शहरातील तरुण डॉक्टरांसाठी ते नेहमीच मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान राहिले. वैद्यकीय सेवेसोबतच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असायचा.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. उपचारासाठी डॉ. संजय महाजन हे मुंबईला गेले होते. तेथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवार दि. २२ डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला या झटक्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे जळगावच्या आरोग्य विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. प्रेमलता महाजन, २ मुली,आई. यांच्यासह मोठा आप्तपरिवार आहे. आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव जळगाव शहरात येणार आहे त्यानंतर अंत्यविधीची तयारी सुरू होईल, अशी माहिती कुटुंबीयांतर्फे देण्यात आली आहे. शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दरम्यान उद्या २३ रोजी सकाळी ८ वाजता प्रताप नगर त्याच्या राहात्या घरुन डॉ. महाजन यांची अंत्ययात्रा निघणार आहे. नेरी नाका वैकुंठ धाम याठीकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.








