केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पॅनलला धक्का
जळगाव (प्रतिनिधी) – मुक्ताईनगरात केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांना धक्का देण्यात शिवसेना शिंदे गट यशस्वी ठरली आहे. या ठिकाणी शिंदे गटाच्या उमेदवाराने नगराध्यपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा २४८६ मतांनी पराभव केला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाजपला आव्हान देण्यासाठी त्यांच्या कन्या संजना पाटील यांना मुक्ताईनगरात नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरवले होते. त्यामुळे संजना पाटील विरूद्ध भाजप उमेदवार भावना महाजन, असा थेट सामना तिथे पाहण्यास मिळाला. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे निवडणुकीदरम्यान मुक्ताईनगरात तळ ठोकून होते. दरम्यान, आमदार पाटील यांनी खडसे कुटुंबियांवर घराणेशाहीचा आरोप करत त्यांच्यामुळेच आपण मुलीला निवडणुकीत उभे केल्याचे म्हटले होते.
निवडणूक निकालात शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांची कन्या संजना पाटील यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारून भाजप उमेदवार भावना महाजन यांचा २४०० पेक्षा अधिक मतांनी पराभव केला. भाजपला मुक्ताईनगरातील निकाल खूपच जिव्हारी लागला आहे. मुक्ताईनगरमध्ये मंत्री रक्षा खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सुनेला साथ मिळावी म्हणून त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी शरद पवार गटाकडून एकही उमेदवार दिला नाही, असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील आणि चंद्रकांत पाटील यांनी केला होता.









