जळगाव (प्रतिनिधी):- श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये माध्यमिक विभागातर्फे थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क, जबाबदारी आणि लोकशाहीतील सहभागाचे महत्त्व याबाबत उपशिक्षिका रूपाली आव्हाड यांनी मार्गदर्शन केले. “मतदान करा, लोकशाही बळकट करा” या संदेशासह विद्यार्थ्यांनी घोषवाक्ये, फलक व प्रतिज्ञा घेत मतदार जनजागृती केली.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, संत गाडगेबाबांच्या विचारांनुसार जागृत, शिक्षित आणि जबाबदार नागरिक बनून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे हेच मतदानाचे खरे महत्त्व आहे, असे सांगितले.कार्यक्रमास शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









