मुक्ताईनगरमध्ये कोथळी गावाजवळ घडली घटना
मुक्ताईनगर (प्रतिनिधी): एसटी बस थांबवली नाही या क्षुल्लक कारणावरून मुक्ताईनगर आगाराच्या बस चालकाला अडवून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर, गुंडगिरी करत आरोपींनी चालकाला पाय धरून आणि नाक घासून माफी मागण्यास भाग पाडले. या धक्कादायक घटनेमुळे एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
फिर्यादी जीवन सुभाष सुरवाडे (वय ३५, रा. कुऱ्हा, ता. भुसावळ) हे मुक्ताईनगर आगारात बस चालक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी, १९ डिसेंबर रोजी ते फैजपूर ते मुक्ताईनगर या मार्गावर प्रवाशांना घेऊन बस (सावदा-उदळी-चिंचोली-चांगदेव मार्गे) जात होते. संध्याकाळी ७:३० वाजेच्या सुमारास वढवे फाटा ते हरताळा फाटा दरम्यान आरोपींनी बसला फ्लॅश लाईट देऊन थांबवण्याचा इशारा केला होता. बस थांबवली नाही या रागातून आरोपी अंकुश राजेंद्र चौधरी (रा. चांगदेव) आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर ३ अनोळखी साथीदारांनी आपल्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची कार कोथळी गावाजवळील आशादेवी मंदिराजवळ बसच्या आडवी लावली.
आरोपींनी चालक जीवन सुरवाडे यांना खाली उतरवून अश्लील शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी व चापटांनी बेदम मारहाण केली.आरोपींनी एवढ्यावरच न थांबता, शासकीय कर्तव्यावर असलेल्या चालकाला धाक दाखवून त्यांना पाय धरून आणि जमिनीवर नाक घासून माफी मागण्यास लावली. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.याप्रकरणी चालक जीवन सुरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अंकुश चौधरी व ३ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत बोदडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.









