चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या ‘बालाजी ट्रेडिंग कंपनी’ या दुकानाचे ड्रॉवर तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ७० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रुपेश सुरेश येवले (वय ३७, रा. एम.जी. नगर, खरजई रोड, चाळीसगाव) यांचे बाजार समितीमध्ये गाळा नं. १७ मध्ये ‘बालाजी ट्रेडिंग कंपनी’ नावाचे आडत दुकान आहे. शुक्रवार, दि. १९ डिसेंबर रोजी दुपारी ४:०० ते ४:५० च्या दरम्यान फिर्यादी आपल्या कामात व्यस्त असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या केबिनमधील टेबलचे ड्रॉवर शिताफीने तोडले. चोरट्यांनी ड्रॉवरमध्ये ठेवलेली भारतीय चलनातील १,७०,०००/- रुपयांची रोकड चोरून नेली. ही चोरीची संपूर्ण घटना अवघ्या ५० मिनिटांच्या कालावधीत घडली असून, बाजार समितीसारख्या गजबजलेल्या ठिकाणी चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
रुपेश येवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची गांभीर्याने दखल घेत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. बाजार समितीमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.









