जळगाव शहरातील खेडीलगतची घटना
जळगाव (प्रतिनिधी):- शासकीय कामासाठी जात असताना पोलिसासह चालकाशी हुज्जत घालत चौघांनी हाईड्रा (क्रेन) हिसकावून घेतले होते. ते एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने मिळाले. मंगळवारी १६ डिसेंबर दुपारी ४ वाजेच्या सुमारास ही घटना शहराजवळील खेडी शिवारात घडली. याप्रकरणी यासीन मुल्तानी सह चौघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी १७ डिसेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बलराज कैलास नारायण बृजवासी (तलेन पोलीस ठाणे, ता.पचोर, म.प्र.) हे तलेन पोलीस ठाण्याच्या आदेशानुसार हाईड्रा (क्रेन) क्रमांक (एमएच-१९ सीजे-४४४८) येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यातून चालक संकर बिलाला सोबत घेऊन जात होते. खेडी शिवारात या क्रेनला संशयितांनी रोखले. पोलिसासह चालकाशी त्यांनी हुज्जत घालत क्रेन त्यांच्या ताब्यातुन घेतले होते. हा प्रकार कॉन्स्टेबल बलराज बृजवासी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सांगितला.
त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी तपास चक्र फिरवून हे क्रेन ताब्यात घेतले. त्यानंतर ते मध्यप्रदेश पोलिसाच्या स्वाधीन केले. दरम्यान शासकीय कामात अडथळा आणला म्हणून तक्रारीनुसार यासीन मुल्तानी, अरबाज मुल्तानी तसेच अन्य दोघे अशा चार जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके तपास करीत आहेत.









