जळगाव शहरातील कोल्हे विद्यालयाजवळ घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील कालिंका माता मंदिर परिसरात कोल्हे विद्यालयाजवळ आज पहाटेच्या सुमारास भीषण आगीची घटना घडून अनेक दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाजवळ, स्टेट बँकेसमोरील पत्र्याच्या शेडखालील काही दुकानांना सकाळी सुमारे चार वाजण्याच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. आगीचे लोळ वेगाने पसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून काही मिनिटांतच अनेक दुकाने जळून खाक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दुकानांमधील अंतर अत्यंत कमी असून केवळ दोन ते तीन इंचाचा गॅप आणि वर पूर्ण पत्र्याचे शेड असल्यामुळे आग झपाट्याने एका दुकानातून दुसऱ्या दुकानात पसरली. आगीत दुकानांतील साहित्य, यंत्रसामग्री, पंखे व इतर सामान पूर्णतः जळाले किंवा वाकले गेले. या आगीत व्हीनस ऑप्टिकलचे गणेश राणे, भगवती ऑटोमोबाईलचे पुष्पक खडके, श्री विघ्नहर्ता स्पेअर पार्ट अँड सर्व्हिसेसचे भूषण वाघुळदे तसेच सखी मॅचिंग सेंटरचे प्रदीप खडके यांच्या दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे पुष्पक खडके यांनी अवघ्या तीन दिवसांपूर्वीच स्पेअर पार्ट विक्रीच्या माध्यमातून नव्या व्यवसायाला सुरुवात केली होती, मात्र पहिल्याच आठवड्यात आगीने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले.
आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत चार ते पाच दुकाने मोठ्या प्रमाणावर जळून नुकसानग्रस्त झाली होती. आगीच्या उष्णतेमुळे दुकानांच्या मागील बाजूस उभ्या असलेल्या कारच्या काचा फुटल्याचेही दिसून आले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शेजारील एका खाद्यपदार्थाच्या दुकानात गॅस सिलेंडर असतानाही ते दुकान आगीपासून वाचले. जर त्या ठिकाणी स्फोट झाला असता तर आणखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती, मात्र प्रसंगावधानामुळे आणि वेळेवर आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच आमदार राजूमामा भोळे आणि माजी नगरसेवक विरेन खडके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी नुकसानग्रस्त दुकानदारांशी संवाद साधत प्रशासनाकडून आवश्यक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, आग लागल्याचे वृत्त समजताच परिसरात नागरिक आणि दुकानदारांनी मोठी गर्दी केली होती.









