जिल्ह्याच्या कृषी विभागाची माहिती
जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व भिस्त रब्बी हंगामावर होती. समाधानकारक पावसामुळे धरणे, बंधारे व लघु-मध्यम सिंचन प्रकल्पांमध्ये सिंचन प्रकल्पांमध्ये पुरेसा साठा उपलब्ध झाला. याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाने २ लाख ७६ हजार ६१० हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन केले होते. त्यापैकी तब्बल २ लाख ४८ हजार ९७७ हेक्टर म्हणजे ९० टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या असून, जिल्ह्यातील रब्बी हंगाम समाधानकारक चित्र दाखवत आहे.

ज्वारी, गहू, मका व हरभरा या प्रमुख पिकांच्या पेरणीत शेतकऱ्यांचा उत्साह दिसून येत आहे. ज्वारीची पेरणी ३३ हजार ८६४ हेक्टरवर (७६ टक्के) झाली आहे. गहू पिकाची पेरणी ४६ हजार ४४९ हेक्टरवर (८१ टक्के) पूर्ण झाली असून, सिंचन सुविधा असलेल्या भागात गहू पिकाला प्राधान्य दिले जात आहे. मक्याची पेरणी ९० हजार ४२६ हेक्टरवर झाली असून नियोजनाच्या १०७ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. मक्याला बाजारपेठेत चांगला दर मिळण्याची अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांचा कल या पिकाकडे वाढलेला दिसतो. हरभऱ्याची पेरणी ७८ हजार ०७३ हेक्टरवर (९० टक्के) झाली.
खरीपाप्रमाणे रब्बीत मकाची पेरणी विक्रमी होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने यंदा रब्बीत मका ८४ हजार १५३ हेक्टरवर पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल ९० हजार ४२६ पेरणी झाली असून, पेरणीची टक्केवारी १०७ टक्के आहे. अजून महिनाभर मका पेरणी होण्याची शक्यता लक्षात घेतात. पेरणीची टक्केवारी १५० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. पीक म्हणून हरभऱ्याला पसंती दिली जात आहे.
खरीपातील नुकसानीनंतर रब्बी हा शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरणार असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. वेळेवर पाणी उपलब्धता, सुधारित बियाणे, खतांचा पुरवठा आणि कृषी विभागाचे मार्गदर्शन यामुळे पेरण्या वेळेत पूर्ण झाल्या. काही भागांत ओलावा टिकून असल्याने पिकांची उगवणही चांगली झाली आहे. मात्र, वाढलेले खत-बियाण्यांचे दर, मजुरीची टंचाई आणि संभाव्य थंडीचा परिणाम याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता कायम आहे. तरीही सध्याची परिस्थिती अनुकूल असून, हवामान साथ दिल्यास रब्बी हंगाम शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न देईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.









