लिंबूवर्गीय शेतीच्या शाश्वत विकासावर मंथन, शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांची असणार उपस्थिती
जळगाव (प्रतिनिधी): देशातील लिंबूवर्गीय फळ (संत्री, मोसंबी, लिंबू) उत्पादनाला नवी दिशा देण्यासाठी इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर (ISC) आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २३ डिसेंबर २०२५ दरम्यान ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५’ (NCS-2025) चे आयोजन केले आहे. जैन हिल्स येथे होणाऱ्या या परिषदेत देशभरातील संशोधक, प्रगतशील शेतकरी, कृषी तज्ज्ञ आणि उद्योजक लिंबूवर्गीय शेतीच्या शाश्वत विकासावर मंथन करतील.

भारत हा लिंबूवर्गीय फळ उत्पादनात जगात तिसऱ्या क्रमांकावर असूनही, सध्या या क्षेत्रासमोर हवामान बदल, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव, दर्जेदार कलमांचा अभाव आणि अनियमित बाजारभाव अशी गंभीर आव्हाने उभी ठाकली आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित या परिषदेचा मुख्य विषय ‘भरघोस उत्पादन, हवामान बदल आणि मूल्य साखळी व्यवस्थापन’ हा ठेवण्यात आलेला आहे. या तीन दिवसीय परिषदेत एकूण नऊ तांत्रिक विषयांवर (Themes) सविस्तर चर्चा होणार आहे. यामध्ये लिंबूवर्गीय वाणांची सुधारणा, रोगमुक्त कलमांची निर्मिती, ‘प्रिसिजन फार्मिंग’ (अचूक शाश्वत शेती), सेंद्रिय लागवड आणि फळबाग आरोग्य व्यवस्थापन यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, लिंबूवर्गीय फळांच्या मूल्य साखळीत जास्त लाभ वाढवण्यासाठी भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, यामध्ये शेतीसाठी ड्रोन, रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा चपखल वापर यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या महत्त्वपूर्ण परिषदेसाठी नागपूर येथील ‘केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था ज्ञान भागीदार आहेत. या समवेतच नवी दिल्ली येथील ‘नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस राहूरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांसारख्या प्रमुख कृषी विद्यापीठांचा या परिषदेत सहभाग असेल. या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन आणि इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर नागपूरचे अध्यक्ष डॉ. दिलीप घोष यांनी केले आहे.









