जळगावात एमआयडीसी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहराच्या औद्योगिक वसाहतीमधील एल-सेक्टरमध्ये असलेल्या माऊली पॅकेजिंग कंपनीच्या आवारात बुधवारी १७ डिसेंबर रोजी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. कंपनीबाहेर साठवून ठेवलेल्या टाकाऊ साहित्याला (वेस्टेज मटेरियल) ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

माऊली पॅकेजिंग कंपनीच्या कंपाऊंडमध्ये शेडसाठी छताचे काम सुरू होते. बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास लोखंडी सांगाड्याचे वेल्डिंग सुरू असताना त्यातून उडालेली एक ठिणगी खाली ठेवलेल्या प्लास्टिक आणि कागदाच्या इतर वेस्टेज मटेरियलवर पडली. साहित्याने काही वेळातच पेट घेतल्याने आग लागली.परिसरात धुराचे लोट दिसताच कंपनीतील कामगार आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठी धावपळ उडाली. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. माहिती मिळताच अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी पाण्याचा मारा करून अवघ्या काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले.
महानगरपालिका अग्निशमन विभागाचे फायरमन निलेश सुर्वे, रजनीश भावसार, विनोद कोळपे, भाग्यश्री बाविस्कर आणि चालक नंदकिशोर खडे यांनी ही आग विझवण्यासाठी मोठे परिश्रम घेतले. एमआयडीसी पोलिसांनीही घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून केवळ टाकाऊ साहित्याचे नुकसान झाले आहे.









