कौतिक नगरसह विविध भागात ‘आरसीसी’ गटारींच्या कामाचे भूमिपूजन
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील विकासकामांना गती देत, प्रभु श्रीराम मंडळ क्रमांक ४ च्या वतीने सोमवार, १५ डिसेंबर रोजी विविध भागात आरसीसी गटारींच्या कामाचे मोठ्या उत्साहात भूमिपूजन करण्यात आले. माजी नगरसेविका रंजनाताई वानखेडे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हे भूमिपूजन पार पडले.
प्रभाग १६ मधील कौतिक नगर, कृष्णा कॉटेज आणि सद्गुरु नगर या परिसरात पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा आणि स्वच्छतेचा प्रश्न सुटावा, यासाठी या आरसीसी गटारींचे काम मंजूर करण्यात आले आहे. या कामामुळे परिसरातील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण होणार आहे. या प्रसंगी माजी नगरसेविका रंजनाताई वानखेडे, डॉ. विरणदादा खडके, सुनीलदादा खडके आणि प्रदीपदादा रोटे यांच्या शुभहस्ते कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विजय वानखेडे (कोषाध्यक्ष), सुनील सरोदे (माजी अध्यक्ष), एकनाथ भावसार, संजय दीक्षित, रुपेश सरोदे, पियुष वानखेडे, दायमा तसेच परिसरातील नागरिक व महिला उपस्थित होते. या कामाचे कंत्राट ठेकेदार जयेश पाटील यांच्याकडे असून, त्यांच्या उपस्थितीत कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. ‘प्रभागाचा विकास आणि नागरिकांच्या समस्या सोडवणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे,’ अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.










