लोकअदालतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची कार्यवाही
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील ११६० ग्रामपंचायतींमधील थकीत मालमत्ता कराची रक्कम वसूल करण्यासाठी जळगाव येथे शुक्रवार, दिनांक १३ डिसेंबर रोजी लोकदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकदालतीच्या माध्यमातून तब्बल ७ कोटी ७६ लाख ९५ हजार ३१४ रुपये इतकी थकीत कररक्कम वसूल करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना दरवर्षी ग्रामपंचायत करापोटी घरपट्टी व पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे भरणे बंधनकारक आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून काही ग्रामपंचायतींमध्ये कराची रक्कम वसूल झालेली नव्हती. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी थकीत कर वसुलीसंदर्भात आवश्यक निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने संबंधित थकीत करदार ग्रामस्थांना लोकदालतीच्या माध्यमातून वसुलीच्या नोटिसा बजावण्यात आल्या. दिनांक १३ डिसेंबर रोजी जिल्हा व सत्र न्यायालय, जळगाव येथे झालेल्या लोकदालतीत या प्रकरणांवर सामंजस्याने तोडगा काढण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर कर वसुली शक्य झाली.
या संपूर्ण प्रक्रियेत ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे ,सहाय्यक गटविकास अधिकारी अजय चौधरी यांनी पुढाकार घेत प्रभावी समन्वय साधला. लोकदालतीच्या माध्यमातून थकीत कर वसुलीस चालना मिळाल्याने ग्रामपंचायतींच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.
तालुका निहाय ग्रामपंचायतीची संख्या व कर वसुली
अमळनेर : ११९ ग्रामपंचायती-७ लक्ष ९१ हजार ६३६ रुपये वसुली
भडगाव : ४९ ग्रामपंचायती-२ लक्ष ३० हजार ९५३ रुपये वसूली
भुसावळ : ३९ ग्रामपंचायती-४० लक्ष ६९ हजार ६९७ रुपये वसुली
बोदवड : ३९ ग्रामपंचायती-११ लक्ष ९० हजार १८२ ग्रामपंचायती
चाळीसगाव : ११४ ग्रामपंचायती-३२ लक्ष ४८ हजार ४१ रुपये वसुली
चोपडा : ९० ग्रामपंचायती-३८ लक्ष ३० हजार ५२९ रुपये वसुली
धरणगाव : ७५ ग्रामपंचायती-६३ लक्ष १२ हजार ६७० रुपये वसुली
एरोंडोल : ५२ ग्रामपंचायती-९ लक्ष २ हजार ४५८ रुपये वसुली
जळगाव : ७० ग्रामपंचायती-७ लक्ष ९२ हजार ८१३ रुपये वसुली
जामनेर : १०७ ग्रामपंचायती-६१ लक्ष ६८ हजार ९४० रुपये वसुली
मुक्ताईनगर : ६१ ग्रामपंचायती-२१ लक्ष १६ हजार ३७३ रुपये वसुली
पाचोरा : १०० ग्रामपंचायती-५२ लक्ष ५० हजार ८१९ रुपये वसुली
पारोळा : ८३ ग्रामपंचायती-१ लक्ष ११ हजार ६७१ रुपये वसुली
रावेर : ९५ ग्रामपंचायती-१४ लक्ष १४ हजार ८० रुपये वसुली
यावल : ६७ ग्रामपंचायती-८७ लक्ष १७ हजार ५२१ रुपये वसुली करण्यात आली आहे.यातील ४ कोटी ५१ लक्ष ४८ हजार ३८३ रुपये इतकी वसुली एकट्या १३ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष लोक अदालतीत जमा झाली आहे.









