एटीएमजवळ हातचालाखी करत सेल्समनची १३ हजारांची रोकड लांबवली
पैसे मोजून देतो म्हणत दोन भामट्यांनी साधला डाव; जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेजवळ भरदिवसा फसवणुकीचा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. एटीएममधून काढलेले पैसे मोजून देतो, असे भासवून दोन अज्ञात व्यक्तींनी एका सेल्समनची १३ हजार रुपयांची रोकड हातचालाखीने चोरून नेल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी तब्बल पंधरा दिवसांनंतर शनिवारी (दि.१३) जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयूर कॉलनीत वास्तव्यास असलेले सतीश दशरथ चौधरी (वय ५७, व्यवसाय – सेल्समन) हे २८ नोव्हेंबर रोजी सकाळी शहरातील एसबीआयच्या मुख्य शाखेत आले होते. त्यांनी एटीएममधून पैसे काढल्यानंतर बाहेर पडताच दोन अज्ञात इसम त्यांच्याजवळ आले. ‘पैसे मोजून देतो’ असे सांगत त्यांनी चौधरी यांचा विश्वास संपादन केला. मात्र काही क्षणांतच हातचालाखी करत त्यांच्या जवळील १३ हजार रुपयांची रोकड लंपास करून ते दोघे पसार झाले.
घटनेनंतर काही वेळातच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सतीश चौधरी यांनी शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दोन भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद भोळे करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एटीएम परिसरात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.









