जळगाव एलसीबी पोलिसांची मोठी कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात गेल्या महिन्याभरात वाढलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांची मालिका स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खंडित केली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या आदेशानुसार केलेल्या विशेष तपासात, जळगाव एलसीबीने आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या एका ‘अट्टल’ गुन्हेगाराला मध्यप्रदेशातून अटक केली आहे. आरोपीने जळगाव शहरातील ४ मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्याच्या इतर ५ साथीदारांचा शोध घेण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.
जळगाव शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना तातडीने तपास करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, पीआय राहुल गायकवाड यांनी पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्यासह सपोउपनिरी अतुल वंजारी, पोहवा विजय पाटील, अक्रम शेख, किशोर पाटील, राहुल रगडे, रविंद्र कापडणे आणि चापोशि महेश सोमवंशी, बाबासाहेब पाटील अशा अनुभवी कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार केले. या पथकाने घटनेच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण आणि कसून तपास करत आरोपीची ओळख पटवली.
तांत्रिक पुराव्यांच्या आधारे, पोलिसांनी रमेश भुरूसिंग अनारे (वय २७, रा. गाव गुडा, ता. कुक्षी, जि. धार, मध्यप्रदेश) या मुख्य आरोपीला निष्पन्न करून ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत, आरोपी रमेश अनारे याने जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील ४ घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.या गुन्ह्यांमध्ये त्याचे ५ साथीदार सामील होते, त्यांची नावे त्याने पोलिसांना दिली आहेत. यामध्ये कुंद्या डावरीया, बरदान देवका, कालु डावरीया, राहुल डावरीया आणि सुनिल परमाती (सर्व रा. मध्यप्रदेश) यांचा समावेश आहे. या सर्व टोळीने आंतरराज्यीय स्तरावर घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.
अटक केलेल्या आरोपी रमेश अनारे यास पुढील कायदेशीर कारवाईसाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके हे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत. आरोपीकडून चोरीस गेलेला लाखोंचा मुद्देमाल हस्तगत होण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.









