मध्य रेल्वेच्या आरपीएफची उल्लेखनीय कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) – तपासातील उत्कृष्टता आणि तांत्रिक कौशल्याचे उल्लेखनीय प्रदर्शन करत, मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने अवघ्या ३ दिवसांत चोरीचा गुन्हा यशस्वीपणे उघडकीस आणला आहे. दि. २० सप्टेंबर रोजी जळगावजवळ गाडी क्रमांक १२१६७लोकमान्य टिळक टर्मिनस – बनारस एक्सप्रेसमध्ये चोरीची घटना घडली. एका महिला प्रवाशाच्या पर्समधील अंदाजे रु ३,००,००० किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले. या प्रकरणाची नोंद जीआरपी भुसावळ/जळगाव येथे करण्यात आली.

सहाय्यक उपनिरीक्षक आणि पोलिस शिपायांचा समावेश असलेल्या आरपीएफ च्या विशेष पथकाने हा गुन्हा उघडकीस आणत मुख्य आरोपी महेश लिंगायत याला केवळ ३ दिवसांत म्हणजेच २३ सप्टेंबर रोजी अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली तसेच २६.१२.२०२४ रोजी गाडी क्रमांक १२९०५ पोरबंदर – शालीमार एक्सप्रेसमध्ये झालेल्या आणखी एका चोरीच्या प्रकरणातील सहभागाची माहिती दिली. यामध्ये प्रवाशाच्या पिशवीतील ९,६४,४००/- रुपये किमतीचे दागिने चोरीस गेले होते. या प्रकरणाची नोंदही जीआरपी भुसावळ/जळगाव येथे झाली होती. त्यानंतर आरपीएफ च्या मदतीने जीआरपीने ने आणखी दोघा आरोपींना राजकुमार विश्वकर्मा आणि मनोज जाधव यांना अटक केली. या तिघांविरुद्ध भारत न्याय संहिता कलम 305(C) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
आरपीएफ च्या पथकांनी जीआरपीने सोबत मिळून उत्कृष्ट शोधक कौशल्य, अचूक गुप्त माहिती विश्लेषण, नजर ठेव तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि समन्वयपूर्ण टीमवर्क दाखवत दोन्ही प्रकरणे यशस्वीपणे उकलली. ही प्रकरणे मध्य रेल्वे आरपीएफ च्या व्यावसायिकता, सचोटी आणि तांत्रिक प्रावीण्याचे प्रतीक ठरतात. मध्य रेल्वे प्रवाशांना विनंती करते की, त्यांनी आपल्या सामानाची काळजी घ्यावी आणि कोणतीही गैरप्रकाराची घटना घडल्यास साहाय्यासाठी १३९ वर संपर्क साधावा.









