साई किसान ठिबक नळी कंपनीला भीषण आग
आगीत उत्पादन साहित्यासह मशिनरी जळून खाक
रात्रभर अग्निशमन दलाची धडाकेबाज मदत
जळगाव (प्रतिनिधी) : एमआयडीसीच्या के-सेक्टरमधील साई किसान (ठिबक नळी उत्पादन कंपनी) येथे बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण परिसर हादरला. आगीने काही मिनिटांतच रौद्ररूप धारण केले असून कोट्यवधींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.
जगन्नाथ जाधव यांच्या मालकीच्या या कंपनीत रात्री काम सुरू असताना अचानक आग लागली. धुराचे लोट दिसताच आत काम करणारे २० ते २५ कर्मचारी तत्काळ बाहेर पडले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. क्षणाक्षणाला आग वाढत जात असल्याने काही वेळातच गोदामाचा भाग पेटला आणि ट्रान्सफॉर्मरचा जोरदार स्फोटही झाला.
आगीचे प्रमाण गंभीर असल्याने जळगाव महानगरपालिकेच्या तीन बंबांसह जैन इरिगेशन, भुसावळ, नशिराबाद, वरणगाव, जामनेर, धरणगाव, पाचोरा आणि शेंदुर्णी नगरपरिषद यांच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले.
सलग अनेक तासांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू होते.
वीज खंडित, बचावकार्यात अडथळे
महावितरणने तत्काळ परिसरातील वीज पुरवठा खंडित केला. अंधार आणि धुराचे प्रचंड प्रमाण यामुळे बचाव पथकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
घटनास्थळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, प्रांताधिकारी विनय गोसावी, एसडीपीओ नितीन गणापुरे, तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांनी पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या.
शॉर्टसर्किटची शक्यता
मालक जगन्नाथ जाधव यांनी सांगितले की, घटनेच्या एक दिवस आधीच कंपनीतील ट्रान्सफॉर्मर आणि कटआउट बदलण्यात आले होते. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किट हा आगीचा प्रमुख कारण असल्याचे दिसत आहे.
अग्निशमन दलातील जवानांचा सहभाग
वाहनचालक : युसूप पटेलदेविदास सुरवाडे,भुषण पाटील, अजय पाटील, निवांत इंगळे,नंदू खडके ,फायरमन :भारत बारी,,विजय पाटीलसंदीप कोळी,जगदीश साळुंखे,मनोज तिरवट,रवी बोरसे,रोहिदास चौधरी,योगेश पाटील,यश मनोरे,भावेश मराठे,गणेश महाजन,चेतन सपकाळे,भाग्यश्री पाटील,नितीन राठोड, शेख आतेमुत्तीरन









