चोपडा तालुक्यातील घटना
जळगाव प्रतिनिधी – जळगाव तालुक्यातील एक बालविवाह तीन दिवसांपूर्वीच उघड झाला होता. आता आणखी एक बालविवाह चोपडा तालुक्यात उघड झाला आहे. १५ वर्षे वयाच्या तरुणीचे एका गावातील तरुणासोबत लग्न लावून देण्यात आले होते. या लग्नसंबंधातून तरुणीही गरोदर राहिली आहे. प्रसूतीसाठी रुग्णालयात आली असता हा प्रकार उघड झाला. याबाबत अडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील एका पाड्यावर राहणारी १५ वर्षे ११ महिन्याची ही तरुणी आहे. १ वर्षापूर्वी या तरुणीचे आई-वडील आणि संशयित आरोपीचे आई-वडील यांनी दोघांचे लग्न लावून दिले होते. त्यानंतर मुलाच्या घरी त्याने केलेल्या शारीरिक संबंधांमधून सदर तरुणी ही गरोदर राहिली. त्यामुळे चोपड्यातील एका दवाखान्यात दाखल केले असता तेथे या तरुणीने एका अपत्याला जन्म दिला.
यावेळी सदर तरुणी ही अल्पवयीन असल्याचे उघड झाल्याने अडावद पोलिसांना माहिती देण्यात आली. तरुणीच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस स्टेशनला सदर अत्याचार करणारा तरुण, त्याचे आई-वडील व मुलीच्या आई, वडील अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनी प्रमोद वाघ करीत आहेत.









