अमळनेर शहरात दामिनी पथकाची धडक मोहीम
अमळनेर ( प्रतिनिधी ) – शहराबाहेरील निर्जनस्थळी अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमी युगुलांवर अमळनेर पोलिसांच्या दामिनी पथकाने धडक कारवाई केली. विशेष म्हणजे मुलांच्या पालकांना बोलावून त्यांना त्यांच्या ताब्यात देत समज देण्यात आली.
काही दिवसांपासून प्रेमी युगुल अंबर्शी टेकडी, गलवाडे रस्ता, साने गुरुजी स्मारक, डुबकी मारोती, शहराबाहेरील मंदिरे आदी ठिकाणी तसेच निर्जनस्थळी प्रेमचाळे करीत असल्याची ओरड होती. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी या बाबीची गांभीर्याने दखल घेत दामिनी पथकाला सक्रिय केले. मोनिका पाटील, नम्रता जरे, श्यामल पारधी, मिलिंद सोनार, गजेंद्र पाटील यांच्या पथकाने शनिवारी दुपारी अंबर्शी टेकडीवर झुडुपात प्रेमचाळे करणाऱ्या तीन जोडप्यांवर कारवाई केली.
गलवाडे येथील दोन मुली व धुळे येथील रहिवासी मात्र अमळनेरात नातेवाइकांकडे शिकणारी एक मुलगी, दोंडाईचा येथील दोन तरुण तसेच गडखांब येथील एका तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. हे तिन्ही युगुल शाळा-महाविद्यालय सोडून या ठिकाणी आल्याचे समजताच दामिनी पथकाने त्यांना अमळनेर पोलिस स्टेशनला आणले. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सर्वाच्या पालकांना बोलावून मुला-मुलींना समज देऊन त्यांच्या ताब्यात दिले.









