वडिलांच्या स्मरणार्थ बारी परिवाराचा स्तुत्य उपक्रम
भुसावळ ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील कुऱ्हा (पानाचे) येथील नागवेल चौक येथे दि. ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ह.भ.प. आर. ए. पाटील यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. नुकतेच दिवंगत झालेले उखा भिका बारी यांच्या स्मरणार्थ हा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बोलताना ह.भ.प. संतोष चौधरी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. दिवंगत उखा बारी यांचे सुपुत्र संजय बारी हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) सक्रिय कार्यकर्ते असल्याने या निमित्ताने प्रवचनपर प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. समाजात प्रबोधनाची किती गरज आहे, हे त्यांनी यावेळी विशद केले.
हभप चौधरी यांनी, “पुनर्जन्म नाही हे संतांनी ठामपणे सांगितले आहे, त्यामुळे पुनर्जन्मासाठी होणारे कर्मकांड हे थोतांड आहे,” असे सोदाहरण पटवून दिले. आपल्या कुऱ्हा गावाला सत्यशोधकांचा वारसा लाभला आहे, याची आठवण करून देत त्यांनी लोकांना अंधश्रद्धा न बाळगता त्यांचे निर्मूलन करून सत्याचा शोध घेण्याचे आवाहन केले. “पुस्तक मस्तक ठिकाणावर आणते, म्हणून प्रत्येकाने पुस्तके वाचली पाहिजेत,” अशी आग्रही भूमिका त्यांनी व्यक्त केली.
यानंतर प्रवचनकार ह.भ.प. आर. ए. पाटील यांनी आपल्या प्रवचनातून चौकातील अशोक स्तंभाचे महत्त्व, राजमुद्रेबद्दलची माहिती तसेच विड्याच्या पानाचे आयुर्वेदातील महत्त्व सांगितले. त्यांनी संत गाडगेबाबा, महात्मा फुले, आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. वेद वाचण्याचा किंवा ज्ञान सांगण्याचा अधिकार एकेकाळी बहुजनांना नव्हता, तो अधिकार संत ज्ञानेश्वर माऊलींमुळे सर्वांना मिळाला, असे समजावून सांगितले.
यावेळी वराडे परिवाराच्या वतीने श्रोत्यांना प्रबोधनपर पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यामध्ये महात्मा फुलेंचे शेतकऱ्याचा आसूड, गुलामगिरी, संविधानावरील पुस्तके, तसेच छत्रपती शिवराय, संत गाडगेबाबा यांच्या चरित्रावरील पुस्तके आणि अंनिस पत्रिका यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘आई प्रतिष्ठानचे’ अरविंद बावस्कर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय बारी यांनी केले. यावेळी वराडे परिवारासह डॉ. टी.टी.बारी, आर. टी. बारी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









