रावेर पोलिसांची धडक कारवाई
रावेर, (प्रतिनिधी) : रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने सोनसाखळी जबरी चोरीच्या दोन गुन्ह्यांची यशस्वीरित्या उकल केली आहे. १ डिसेंबर रोजी रावेर-वाघोड रस्त्यावर एका महिलेच्या गळ्यातील १० ग्रॅम सोन्याची पोत (मंगळसूत्र) हिसकावून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. यात अजय गजानन बेलदार (वय २०, रा. अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर) आणि नरेंद्र उर्फ निलेश अशोक बेलदार (वय २०, रा. अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग घेतला. संशयित आरोपींनी गुन्हा करताना विना नंबर प्लेटच्या पल्सर दुचाकीचा वापर केला होता. माहिती मिळाल्यानंतर पथकाने मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली परिसरात तळ ठोकून पाठलाग करत दोन्ही आरोपींना शिताफीने अटक केली. यावेळी गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर दुचाकी आणि १३.३०४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण रु. २,५०,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी रावेर येथील गुन्ह्यासह कुऱ्हा काकोडा बस थांब्याजवळ झालेल्या आणखी एका सोनसाखळी चोरीची कबुली दिली आहे. पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पो. अधिक्षक अशोक नखाते, पोलिस उपअधिक्षक फैजपुर विभाग अनिल बडगुजर, रावेर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाहीत पो.उप. निरीक्षक तुषार पाटील, गुन्हे शोध पथकातील कल्पेश आमोदकर, विशाल पाटील, प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण, सुकेश तडवी, विकार शेख, भुषण सपकाळे, अतुल गाडीलोहार, सायबर पोलिस स्टेशनचे मिलींद जाधव, गौरव पाटील यांचा सहभाग होता. पुढील तपास पो. उप. निरीक्षक तुषार पाटील करत आहेत.









