आगार व्यवस्थापकांना निवेदन देऊन वेधले लक्ष
जळगाव ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बससेवेतील अनागोंदी आणि अनियमिततेमुळे जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले आहे. बससेवा वेळेवर उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असून, या गंभीर प्रश्नावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तीव्र भूमिका घेतली आहे.
जळगाव शहर हे जिल्ह्याचे प्रमुख शैक्षणिक केंद्र असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ‘लालपरी’ने प्रवास करतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून बससेवा वेळापत्रकानुसार उपलब्ध होत नसल्याची विद्यार्थ्यांची मोठी तक्रार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पोहोचायला उशीर होत असून, त्यांचा अभ्यास बुडत आहे. सर्व ग्रामीण भागातील थांब्यांवर बसेस वेळेवर उपलब्ध व्हाव्यात. विद्यार्थ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या वाहकांवर योग्य पुरावा मिळाल्यास कठोर कारवाई करण्यात यावी. शासकीय तंत्रनिकेतन आणि कोर्ट चौक या प्रमुख थांब्यांवर यावल-चोपडा आणि धरणगाव-एरंडोल मार्गे जाणाऱ्या बसेस थांबल्याच पाहिजेत. पास नूतनीकरणासाठी विद्यार्थ्यांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. हे काम लवकरात लवकर आणि सुलभ व्हावे यासाठी उपाययोजना करावी, अशा मागण्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केल्या आहेत.
अभाविपचे महानगर मंत्री चिन्मय महाजन यांनी आगार व्यवस्थापकांना निवेदन सादर करून या सर्व समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अधिक तीव्र आंदोलन करेल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.









