प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे गंभीर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
जळगाव ( प्रतिनिधी ) – व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ तसेच विविध मागण्यांसाठी ५ डिसेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती व दाणा बाजारमधील व्यापाऱ्यांकडून बंद पाळण्यात येणार आहे. दाणाबाजारसह कृषी उत्पन्न बाजार समितीमधील १९२ दुकाने बंद ठेवली जाणार आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील जुने कायदे, राष्ट्रीय बाजार समितीवरील प्रस्तावित धोरणातील त्रुटी, अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये व्यापाऱ्यांवर होत असलेल्या कारवाईविषयी व्यापाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ५ डिसेंबर रोजी राज्यात बंद पाळण्याचा निर्णय व्यापारी संघटनांच्या राज्यव्यापी परिषदेने घेतला आहे. त्याला कृषी उत्पन्न बाजार समिती व दाणा बाजारमधील व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.
व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष अशोक धूत यांनी कळविले आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये माल आणू नये, असे जळगाव जिल्हा मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक राठी यांनी कळविले आहे.









