नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – सरकारने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी सरकारने जाहीर केली. शेतकऱ्यांना सुलभ आणि सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सरकार करत असताना बीड जिल्हा बँकेने खोडसाळपणा केला आहे. शिरूरमध्ये जिल्हा बँकेच्या शाखेने कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी खड्डे असलेल्या ठिकाणी लावली. त्यामुळे यादी बघण्यासाठी शेतकऱ्यांना खड्ड्यातच उतरावे लागत आहे. तसेच यादी बघताना अनेक शेतकरी खड्ड्यातही पडले आहेत.
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतंर्गत कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी सरकारने जाहीर केली. जिल्हा बँकेने ती यादी प्रसिद्ध करत खातेदारांची यादी भिंतीवर चिटकवली आहे. नोटीस बोर्ड नसल्याने बँकेच्या बाहेरील भिंतीचा त्यासाठी वापर करण्यात आला. शिरूरच्या डीसीसी शाखेने कर्जमाफी शेतकऱ्यांची यादी लावण्यासाठी दुसरी चांगली जागा असतानाही चार ते पाच फूटांचा खड्डा असलेल्या ठिकाणीच यादी लावली आहे. त्यामुळे यादी वाचण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यामुळे नीट उभे राहून यादी बघणेही कठीण झाले आहे. आपले नाव यादीत आहे की नाही, ते बघत असताना अनेक शेतकरी खड्ड्यामध्ये पडले आहेत. जिल्हा बँकेच्या या खोडसाळपणाविरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.