जळगाव महानगरपालिका निवडणुकीत नावाची जोरदार चर्चा
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यातील भाजपचे नेते गिरीश महाजन यांचे सर्वात विश्वासू आणि जमिनीवर काम करणारे कार्यकर्ता म्हणून ओळखले जाणारे अरविंद देशमुख यांचे नाव जळगाव महानगरपालिका निवडणुकीत जोरदार चर्चेत आहे. यापूर्वी जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत विक्रमी मतांनी मिळालेला विजय आणि नंतर जिल्हा कृषि औद्योगिक सहकारी संस्थेत बिनविरोध निवड हे त्यांच्या संघटनक्षमतेचे ठळक प्रदर्शन ठरले आहे.
जळगावात पंधरा वर्षांची ओळख आणि लोकांशी नाळ
अरविंद देशमुख गेल्या पंधरा वर्षांपासून जळगावात वास्तव्यास असून खोटे नगर परिसरात त्यांचे स्वतःचे घर आहे. शहराशी जवळीक आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी समजण्यामुळे त्यांची ओळख साधी, जमिनीवरची आणि सामान्य लोकांशी नाळ जोडणारी आहे.
नामदार गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात त्यांचे बसण्याचे ठिकाण असल्यामुळे जळगाव शहरासोबतच जिल्ह्यातील अनेक नागरिक तातडीने भेट घेऊ शकतात. कोणतीही समस्या मांडली की तत्काळ उपाय करण्याचा त्यांचा स्वभाव शहरभर ओळखला जातो. नागरिकांमध्ये असा विश्वास निर्माण झाला आहे की, फोन आल्यावर काम लगेच सोडवून दिले जाते.
यावल निवडणुकीत व्यस्त, तरी जळगाव शहरात चर्चा कायम
सध्या अरविंद देशमुख यावल, रावेर, फैजपूर आणि सावदा येथील निवडणुकांमध्ये व्यस्त असले तरी जळगाव शहरात त्यांची उमेदवारीची चर्चा थांबत नाही. वार्ड क्रमांक १०, ८ आणि १६ मध्ये कार्यकर्ते आणि नागरिक त्यांच्या नावाची जोरदार चर्चा करत आहेत. जर अरविंद देशमुख मैदानात उतरले, तर गिरीशभाऊंचा विश्वास असलेल्या कार्यकर्त्याला संधी मिळेल, अशी अपेक्षा शहरात निर्माण झाली आहे, ज्यामुळे उत्सुकता अधिक वाढलेली आहे.
उमेदवारी मिळाल्यास अपेक्षित बदल
अरविंद देशमुख यांची ओळख साधी, तात्काळ प्रतिसाद देणारी आणि सामान्य लोकांमध्ये मिसळून काम करणारी आहे. जिल्हाभराचे संपर्कजाळे, शांतपणे काम करण्याची शैली आणि विविध स्तरांवर मिळणारा पाठिंबा हे त्यांचे बळ आहे. पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास आहे की, ही प्रतिमा महानगरपालिका निवडणुकीत त्यांना भक्कम स्थान मिळवून देऊ शकते.









