विकासाकरिता भाजपच्या उमेदवारांना विजयी करा -इद्रीसभाई मूलतानी
प्रभाग क्र. १३, १४ आणि १५ च्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
चाळीसगाव (प्रतिनिधी) – भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रीसभाई मूलतानी यांच्या प्रभाग क्र. १३, १४ आणि १५ मधील जाहीर सभेला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला. केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ अल्पसंख्याक समाजाला मोठ्या प्रमाणात होत असून, विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी पक्ष-गट बाजूला ठेवून भाजपला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

मूलतानी म्हणाले की, “आपली वस्ती, मोहल्ले विकासात मागे राहू नयेत यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विजयी करा. नगरपालिका निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष आणि आपल्या प्रभागातील सर्व उमेदवारांना पाठिंबा द्या.”
सभेत आमदार मंगेश चव्हाण यांनीही उपस्थितांशी संवाद साधत चाळीसगाव विकासाची ब्ल्यू-प्रिंट मांडली. प्रभागातील उर्वरित रस्ते, नाले, गटारी, आरोग्य सुविधा तसेच भावी पिढीच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात कामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“चाळीसगावच्या सर्वांगीण विकासासाठी आपला विश्वास आणि मताधिक्य फार महत्त्वाचे आहे,” असे आवाहन करत चव्हाण यांनी भाजप उमेदवारांना भरघोस मतदान करण्याची विनंती केली.









