“जनतेचा विश्वास, जनतेचे हित आणि जनतेचा विकास”-आ. अमोल पाटील
डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्या प्रचारार्थ एरंडोल शहरात प्रचाररॅली; नागरिकांच्या भेटीगाठींना उत्स्फूर्त प्रतिसाद
एरंडोल (प्रतिनिधी)— एरंडोल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५च्या पार्श्वभूमीवर शिवसेना–भाजपा महायुतीचे लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. नरेंद्र धुडकु ठाकुर तसेच प्रभाग क्र. ४-अ चे कुणाल रमेश महाजन, प्रभाग ४-ब ची सुनिता रूपेश माळी, प्रभाग ६-अ चे अनिल केशव महाजन व प्रभाग ६-ब ची आरती योगेश देवरे यांचा प्रचारार्थ आमदार अमोल पाटील यांनी आज शहरात प्रचार रॅली काढून नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या.
शहरातील विविध भागांत झालेल्या संवाद यात्रेत नागरिकांनी महायुतीच्या उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत शुभेच्छा दिल्या. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत आमदार पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करत शहराच्या विकासाबाबत आपली भूमिका मांडली.
सभेत आमदार पाटील म्हणाले, “आपल्या सर्वांच्या प्रेमाने, पाठबळाने आणि विश्वासाने आपण विकासाचा प्रवास एकत्र पार पाडला आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, उद्योजकता, युवकांसाठी संधी—हे सर्व आपल्या शहराच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहेत. विकास ही एका व्यक्तीची किंवा पक्षाची मालकी नसून तो जनतेच्या सहभागानेच घडतो.”ते पुढे म्हणाले की शहराच्या पुढील दिशादर्शक योजना, प्रकल्पांची प्राधान्यक्रम व नागरिकांच्या मागण्या लक्षात घेऊन पारदर्शकता, प्रामाणिकता, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि सर्वसमावेशकता या चार स्तंभांवर आगामी कामकाज उभारले जाणार आहे.
सभेच्या शेवटी आमदार पाटील यांनी नागरिकांचे आभार मानत आगामी नगरपरिषद निवडणुकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.यावेळी बाजार समितीचे मा. सभापती शालिकभाऊ गायकवाड, माजी नगराध्यक्ष रमेशआण्णा महाजन, रमेशभैय्या परदेशी, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, तसेच शिवसेना–भाजपा महायुतीचे पदाधिकारी, शहरातील कार्यकर्ते, शिवसैनिक व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.









