युट्यूबवरून चोरीचे तंत्र शिकणारी ‘लेडी स्नॅचर’ अखेर गजाआड
शनिपेठ पोलिसांची कारवाई; बरेलीहून अटक ; बाफना, भंगाळे, गाडगीळ ज्वेलर्समधून 4.70 लाखांच्या अंगठ्या लंपास
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील नामांकित सुवर्णपेढ्यांमध्ये हातचलाखीने 4.70 लाखांच्या अंगठ्या चोरणारी कुख्यात लेडी स्नॅचर लकी शिवशक्ती शर्मा (38, रा. बरेली, उत्तरप्रदेश) अखेर शनिपेठ पोलिसांच्या सापळ्यात अडकली. युट्यूबवरील क्राइम पेट्रोल, सावधान इंडिया यांच्या एपिसोडमधून चोरीचे तंत्र शिकत ती मागील दहा वर्षांपासून विविध राज्यांत सोन्याची दुकाने फोडत असल्याचे तपासात स्पष्ट झाले.
सीसीटीव्हीतील चेहरा ठरला महत्वाचा धागा
ऑक्टोबरमध्ये आर.सी. बाफना, भंगाळे ज्वेलर्स आणि पु.ना. गाडगीळमध्ये एकापाठोपाठ तीन चोरीच्या घटना घडल्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिलेचा स्पष्ट चेहरा मिळताच तपासाला गती मिळाली. तांत्रिक तपासातून ती बरेली येथील असल्याचे निष्पन्न झाल्यावर निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी प्रदीप नन्नवरे, वैशाली पावरा व निलेश घुगे यांच्या पथकाने बरेली गाठून तिला अटक केली.
युट्यूब, गुगल मॅप आणि बनावट अंगठ्यांचा खेळ
चोरीपूर्वी गुगल मॅपवरून शोरूमची लोकेशन तपासणे, आणि चोरीच्या पद्धती युट्यूबवरून शिकणे—अशा पद्धतीने ती योजनाबद्धपणे काम करीत असे. दुकानात ग्राहकांचे लक्ष विचलित करीत खरी अंगठी बनावट अंगठीशी अदलाबदल करणे, तसेच बनावटपणासाठी जुन्या दागिन्यांची लेबले व क्यूआर टॅग चोरून ठेवणे, हेही उघड झाले.
जळगावनंतर नागपूरमध्येही प्रयत्न
जळगावातील चोरीनंतर ती नागपूरला जाऊन खंडेलवाल व लोंदे ज्वेलर्सना लक्ष्य केले. मात्र जळगाव सराफ असोसिएशनने राज्यभर जारी केलेल्या सावधानतेमुळे नागपूरमधील सराफ सजग होते. अंगठी चोरण्याचा प्रयत्न करताच संशय येऊन तिला ताब्यात घेण्यात आले. नवीन गुन्हा दाखल झाला नसला तरी तिच्या गुन्हेगारी पद्धतीची खात्री पटली.
विविध राज्यांमध्ये गुन्हे उघड
हरियाणा, हिमाचल प्रदेश, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव अशा अनेक ठिकाणी अशाच प्रकारच्या चोरी केलेल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली असून तिच्या गुन्ह्यांचा व्याप आणखी मोठा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









