अपघातामागे घातपाताची शक्यता, नातेवाईकांचा ‘सदोष मनुष्यवधा’चा आरोप
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात शोककळा
मलकापूर (प्रतिनिधी) – तेलंगणातून जळगाव–खान्देशातील एका लग्नसमारंभासाठी निघालेल्या एका दाम्पत्याचा अखेर तीन दिवसांच्या अथक शोधानंतर शोध लागला. राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर वडनेर भोलजी उड्डाणपुलाजवळील झुडपांनी आच्छादलेल्या एका विहिरीत त्यांची कार आढळून आली. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे २.२० वाजता पती–पत्नीचे मृतदेह कारमध्येच सापडल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

तेलंगणातील सीतापूरम येथील सिमेंट कंपनीत कार्यरत असलेले पद्मसिंह दामू पाटील (वय ४९) आणि त्यांची पत्नी नम्रता (वय ४५) डोकलखेडा या. पाचोरा येथील लग्नसमारंभासाठी ते एमएच १३ बीएन ८४८३ या क्रमांकाच्या कारने २७ नोव्हेंबर रोजी निघाले होते. २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता त्यांचा नातलगांशी शेवटचा संपर्क झाला. त्यानंतर त्यांचे फोन बंद झाले.

पोलिस तपासात दाम्पत्याने २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३१ वाजता बाळापूर टोलनाका पार केल्याची माहिती मिळाली. मोबाइलचे शेवटचे लोकेशन वडनेर भोलजी परिसरात आढळले. नांदुरा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार, महामार्गालगतच्या सर्व विहिरी, नाले आणि झाडाझुडपांची तपासणी सुरू झाली. पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक गजानन कौळासे यांच्या पथकाने तपासणी वाढवली. मलकापूर–वडनेरदरम्यान तपासलेल्या पाचव्या विहिरीत अखेर दाम्पत्याची कार दिसली आणि संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

शनिवारी सकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात आढावा घेतला. कार आढळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. ओम साई फाउंडेशनचे रेस्क्यू कार्यकर्ते, नांदुरा फायर ब्रिगेड आणि पोलीस दलाच्या मदतीने सायंकाळपर्यंत दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले.
या घटनेला वेगळे वळण देत मृताचे नातेवाईक संदीप रमेश पाटील यांनी हा अपघात नसून खून असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच, महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पोलिस तपास सुरू असून या घटनेमागील वास्तविक काय आहे .याचा शोध घेण्यासाठी पुढील तपास अधिक वेगाने सुरू आहे.









