जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगावमध्ये हॉटेल विक्रीच्या वादातून बांधकाम व्यावसायिक खुबचंद प्रेमचंद साहित्या (वय ६०, रा. मोहाडी रोड) यांना चार जणांनी रूममध्ये घुसून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. २६ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास के.पी. प्राईड हॉटेलच्या रूम क्रमांक २०७ मध्ये आलेल्या चार संशयितांनी साहित्या यांना बेल्ट, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत टेबलावर ठेवलेल्या पाकिटातून २० ते २५ हजार रुपये हिसकावले आणि तेथून पळ काढला.
साहित्या यांचा मुलगा नितीन याने काही वर्षांपूर्वी बँक आणि इतरांकडून घेतलेली कर्जे न फेडल्याने आर्थिक अडचणी वाढल्या. त्यामुळे हॉटेल विक्रीचा व्यवहार दोन वर्षांपूर्वी कुलभूषण पाटील यांच्यासोबत करण्यात आला होता. मात्र एक वर्ष उलटूनही प्रत्यक्ष खरेदी न झाल्याने त्या सौद्याला तात्पुरता ब्रेक लागला. यानंतरही व्याजाचा बोजा वाढत गेल्याने पुन्हा विक्रीचा प्रयत्न सुरू झाला आणि दहा कोटी रुपयांत व्यवहार ठरल्याची माहिती साहित्या यांनी पोलिसांना दिली. त्या सौद्यातून तिन्ही कोटी रुपये घेऊन नितीन साहित्या याने सौदापावतीही केली होती, तरीही अंतिम खरेदी न झाल्याने मतभेद तीव्र झाले.घटनेच्या रात्री साहित्या रूममध्ये विश्रांती घेत असताना चार अनोळखी इसमांनी अचानक आत घुसून कोणतीही चर्चा न करता बेदम मारहाण केली आणि रोकड घेऊन पसार झाले. शहरात या प्रकारानंतर व्यापारी आणि हॉटेल व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मारहाणीत जखमी झालेल्या खुबचंद साहित्या यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांच्या पुतण्याने सीसीटीव्ही फुटेज तपासताना चार आरोपींपैकी दोघांना ओळखले. साहित्या यांनी नोंदवलेल्या जबाबावरून देवेंद्र उर्फ छोटू पवार, निखिल (पूर्ण नाव उपलब्ध नाही) आणि इतर दोन अनोळखी आरोपींवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









