जळगावातील नवीन बसस्थानकातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील नवीन बसस्थानक परिसर पुन्हा एकदा चोरट्यांच्या निशाण्यावर आला आहे. चाळीसगावला जाणाऱ्या बसमध्ये चढण्याच्या घाईत झालेल्या धक्काबुक्कीत एका ५५ वर्षीय गृहिणीची पर्स लंपास झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधील मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा मिळून ९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल लांबवला .
हिराशीवा कॉलनीतील मनीषा राजेंद्र पाटील या बुधवारी दुपारी मुलगा पियुषसोबत माहेर नांद्रा (ता. पाचोरा) येथे जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आल्या. चाळीसगाव मार्गावरची बस पकडण्यासाठी त्या दुपारी पावणे दोनच्या सुमारास गाडीपाशी गेल्या. दरम्यान, बसजवळ मोठी गर्दी झाल्याने चढताना गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या खांद्यावरच्या पिशवीवर हात साफ केला. बसमध्ये चढल्यानंतर पिशवीची चेन उघडी असल्याचे आणि पिशवी फाटल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ तपासणी केली. त्यावेळी पर्समधील साधारण ९ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि ७०० रुपयांची रोकड गायब झाल्याचे उघड झाले.याबबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









