“विकासाचे ठोस व्हिजन आमच्याकडे- आ. अमोल पाटील
एरंडोल येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य रॅली , जाहीर सभा ; विकासाचा संदेश घराघरात
एरंडोल प्रतिनिधी एरंडोल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेना महायुतीतर्फे भव्य प्रचार रॅली आणि कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार डॉ. नरेंद्र धुडकु ठाकुर तसेच प्रभाग २ अ, ७ ब आणि ११ च्या तीनही विभागांतील उमेदवारांच्या प्रचारार्थ या कार्यक्रमाचे आयोजन झाले होते.

या रॅलीत प्रभाग २ अच्या डॉ. गीतांजली नरेंद्र ठाकुर आणि प्रमोद राजेंद्र महाजन, प्रभाग ७ बचे जोहरी सागर मोतीवाले, प्रभाग ११ अच्या मालती अमोल वाणी, ११ बच्या मंजुळाबाई नथ्थु चौधरी आणि ११ कचे संजय सुरेश पाटील या उमेदवारांचा परिचय करून देत महायुतीने आपली ताकद दाखवून दिली.

सभेला धरणगाव बाजार समितीचे सभापती शालिकभाऊ गायकवाड, माजी नगराध्यक्ष राजुआबा चौधरी, विठ्ठलबाबा आंधळे, किशोरभाऊ निंबाळकर, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक चिंतामण पाटील, डॉ. एन. डी. ठाकुर आणि नेते अनिलशेठ टोळकर यांच्यासह महायुतीचे शेकडो पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली.
सभेत बोलताना आमदार अमोलदादा पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. “विरोधकांची उमेदवार शोधा-शोध करण्याची वेळ आली आहे. त्यांच्याकडे ना योजनांचा व्हिजन, ना विकासाची दिशा. भुलथापा देऊन निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न पुन्हा करणार असतील, तर यावेळी सुजाण जनता त्यांना योग्य जागा दाखवेल,” असे ते म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या काही वर्षांत एरंडोल शहरात झालेल्या विकासकामांनी शहराचे स्वरूप बदलून टाकले आहे. पाणीपुरवठा, भुयारी गटार योजना, रस्ते-विकास, नागरी सुविधा या सर्व मूलभूत सोयींच्या उभारणीमुळे शहराचा कायापालट झाला असल्याचा दावा आमदारांनी केला.
“विकासाचे ठोस व्हिजन आमच्याकडे आहे; विरोधकांकडे फक्त कुरघोड्या आणि खोटे आश्वासने. एरंडोलच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा,” असे आवाहन त्यांनी मायबाप जनतेला केले.
महायुतीच्या या रॅलीमुळे शहरातील निवडणूक चौरसात तापमान आणखी वाढले असून पुढील प्रचारपर्वात रंगत अधिक वाढणार आहे.









