रामानंद नगर पोलिसांची मोठी कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) – राज्यात बंदी असलेला तब्बल ३० लाखांचा गुटखा पिंप्राळा परिसरातून जप्त करून रामानंद नगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सेंट्रल बँक कॉलनी, पिंप्राळा येथे संशयास्पदरित्या उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाची तपासणी केली असता प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखूचा मोठा साठा आढळला. वाहन चालक किरण भास्कर नांदरे (वय ४३) याला ताब्यात घेत असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी दुपारी पिंप्राळ्यातील एकमुखी दत्त मंदिराजवळ (एमएच १९ सीएक्स ६६३४) क्रमांकाचे वाहन संशयास्पद स्थितीत उभे असल्याची माहिती पोलिसांना मिळताच उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोहेकॉ कालसिंग बारेला, प्रवीण जगदाळे आणि विनोद सूर्यवंशी यांनी तत्काळ धाव घेतली. वाहनात राज्यात बंदी असलेल्या पदार्थांची वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाला कळविण्यात आले. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार व अमोल जगताप, आकाश बोऱ्हाडे, योगराज सूर्यवंशी यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
तपासणीत वाहनातून २४ लाख २० हजार रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला आणि तंबाखूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या संपूर्ण कारवाईचा पंचनामा करून वाहनासह सर्व मुद्देमाल रामानंद नगर पोलिस ठाण्यात आणण्यात आला. नांदरे याला अटक करून त्याची कसून चौकशी सुरू असून हा मोठा साठा कोणाला पुरवला जाणार होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.









