जळगावमध्ये कारमालकाच्या नातेवाईकाला अटक
जळगाव (प्रतिनिधी) – घरासमोरून चोरीला गेलेली कार अखेर छत्रपती संभाजीनगर येथे सापडली असून, या चोरीमागे कोणी परका नाही, तर चक्क कारमालकाचा जवळचा नातेवाईकच असल्याचे उघड झाले आहे. जळगाव एमआयडीसी पोलिसांनी या धक्कादायक प्रकरणाचा छडा लावत आरोपीला अटक केली असून, चोरीस गेलेली कारही जप्त केली आहे.

जळगावातील रामेश्वर कॉलनीचे रहिवासी गणेश पांडुरंग जामोदे (वय ३७) यांच्या घरासमोर उभी असलेली त्यांची कार २० नोव्हेंबर रोजी चोरीला गेली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली होती.
या प्रकरणाचा तपास करत असताना एमआयडीसी पोलिसांनी संशयाच्या आधारावर विजय मनोहर जाधव (वय ३२, रा. नवनाथ नगर) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत, विजय जाधव यानेच कार चोरल्याची कबुली दिली आणि ती कार छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याची माहिती दिली. तात्काळ, पोलिसांचे एक पथक छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले आणि त्यांनी चोरीस गेलेली कार हस्तगत केली.
पोलिसांच्या तपासात विजय जाधव आणि कारमालक गणेश जामोदे यांच्यातील संबंधांचे गूढ उकलले. विजय जाधव हा गणेश जामोदे यांचा जवळचा नातेवाईक असून त्याचे त्यांच्या घरी नेहमी ये-जा असायचे. विशेष म्हणजे, विजय जाधव हा वारंवार जामोदे यांना ‘कार खूप जुनी झाली आहे, ती विकून टाकावी’ असा सल्ला देत होता. प्रत्यक्षात, त्यानेच ही कार चोरल्याचे सत्य समोर येताच जामोदे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
चोरी केलेली कार छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ लावून ठेवली होती की, ती विक्री करण्याच्या प्रयत्नात होता, या दृष्टीने एमआयडीसी पोलीस आता आरोपी विजय जाधव याची कसून चौकशी करत आहेत. नातेसंबंधाचा गैरफायदा घेऊन केलेल्या या चोरीमुळे जळगावात आश्चर्य व्यक्त होत आहे.









