चार जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा नोंद
फिर्यादी संतोष माणिक चौधरी (वय ६७, रा. निमखेडी शिवार) यांनी तक्रारीत म्हटले आहे की, २१ फेब्रुवारी २०२१ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या चार वर्षांच्या कालावधीत ही फसवणूक करण्यात आली. शहरातील नवीन बसस्थानकाजवळील चिमुकले राम मंदिर परिसरात आरोपींनी चौधरी यांच्याशी ओळख वाढवून विश्वास संपादन केला.
संदिप वसंत भोळे, दिपाली संदिप भोळे (दोघे रा. जिल्हापेठ, जळगाव), तसेच त्यांच्या साथीदार धिरज पांडुरंग मुंगलमारे (भंडारा) आणि अण्णा नामदेवराव गोहत्रे (नागपूर) या चौघांनी फिर्यादी यांचा मुलगा जगदिश चौधरी याला रेल्वेत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्यांनी रोख आणि ऑनलाइन व्यवहारातून तब्बल १५ लाख रुपये स्वीकारले.
बनावट नियुक्ती आदेश देऊन दिशाभूल
पैसे घेतल्यानंतर आरोपींनी जगदिश चौधरी यांना रेल्वेत नोकरी लागल्याचा बनावट नियुक्ती आदेशही दिला. मात्र प्रत्यक्षात नोकरी न लावता आणि घेतलेले पैसे परत न करता आरोपींनी केवळ २ लाख ५० हजार रुपये परत केले, तर उर्वरित १२ लाख ५० हजार रुपये हडप केले.
फसवणूक उघडकीस येताच संतोष चौधरी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौघांविरुद्ध फौजदारी फसवणुकीसह संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे.









