नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – बीजिंग, कोविड-19 च्या मुद्द्यावरून जगभरातून चीनवर जो दोष दिला जात आहे, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी चीनकडून काल एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये चीनने स्वतःला निर्दोष जाहीर केले आहे. करोनाच्या साथीबाबत उशिराने माहिती दिल्याचा आरोप या श्वेतपत्रिकेमध्ये स्पष्टपणे फेटाळण्यात आला आहे, अशी माहिती शिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिली आहे. ‘फायटिंग कोविड-19, चायना इन ऍक्शन’ असे या श्वेतपत्रिकेचे नाव आहे.
अज्ञात, अनपेक्षित आणि विनाशकारी अशा करोना विषाणूच्या साथीचा मुकाबला चीनलाही करायला लागला आहे. चीनने मोठ्या धैर्याने आणि ठामपणे या साथीचा मुकाबला केला आणि करोनाच्या साथीला नियंत्रित केले आहे, असे या श्वेतपत्रिकेमध्ये म्हटले आहे.
चीनमध्ये करोनाच्या साथीला आटोक्यात आणले गेले आहे. करोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी संसर्गाचे सर्व मार्गही तोडून टाकण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर जगभरातील करोनाचा प्रादुर्भाव आता कमी होत आहे, असेही या श्वेतपत्रिकेमध्ये म्हटले आहे. जर जगभरातील सर्व देशांनी एकत्रितपणे आणि सहकार्याच्या भावनेतून करोनाचा मुकाबला केला, तरच करोनाच्या आपत्तीवर विजय मिळवण्यात आंतरराष्ट्रीय समुदायाला यश मिळू शकेल. त्यामुळेच मानवतेच्या इतिहासातील या अंधःकारमय काळातून बाहेर पडून प्रकाशाकडे वाटचाल करता येईल, असेही या श्वेतपत्रिकेत म्हटले गेले आहे.
1949 मध्ये पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाची स्थापना झाली. तेव्हापासून आतापर्यंत अन्य कोणत्याही साथीपेक्षा सर्वात वेगाने आणि व्यापक प्रमाणात करोनाची साथ पसरली आहे. या साथीवर नियंत्रण मिळवणेही अवघड आहे. कम्युनिस्ट पार्टीच्या मध्यवर्ती समितीचे सरचिटणीस शी जिनपिंग यांनी यासाठी सर्व सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांनी सर्व आढावा घेऊन निर्णायक कृती केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या उपाययोजनांमुळेच या विषाणूवर मात करणे चीनला शक्य झाले, असेही या श्वेतपत्रिकेत म्हटले आहे.
करोनाचा फैलाव वुहानमधून झाला या आरोपाचे खंडन करण्यासाठी श्वेतपत्रिकेत अनेक स्पष्टीकरणे दिली गेली आहेत. या विषाणूबाबत चीनने कोणतीही पारदर्शकता ठेवली नाही. त्यामुळे जगभरात मोठी जीवित आणि वित्तहानी झाली, असा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अन्य देशांच्या नेत्यांनी सातत्याने केला आहे.
जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या अंदाजानुसार जगभरात 68 लाखांपेक्षा अधिक जणांना करोनाची बाधा झाली असून 4 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत 19 लाख जणांना या विषाणूची लागण झाली आणि 1 लाखापेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. तर चीनमध्ये केवळ 84 हजार जणांना बाधा झाली आहे.