चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – “राजकारणात निवडणुका येतात-जातात, पदे मिळतात-जातात… पण काही क्षण मनाच्या गाभाऱ्यात कायमचे कोरले जातात. आजचा दिवस माझ्यासाठी तसाच अविस्मरणीय,” असे मनापासून व्यक्त करत आमदार मंगेश चव्हाण यांनी सिंधी समाजाच्या अभूतपूर्व पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
प्रभाग क्र. ८ आणि ११ मधील सिंधी समाज बांधवांनी आज “जाहीर वचन सभा” घेत भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांना एकमुखी पाठिंबा देण्याची घोषणा केली. संपूर्ण समाजाने उपस्थित राहून दिलेले हे वचन पाहताच सभागृहात एका वेगळ्याच ऊर्जा आणि ऐक्याची भावना पसरली.

आमदार चव्हाण म्हणाले की, “गेल्या तीन-चार वर्षांत चाळीसगावच्या स्मार्ट विकासासाठी हाती घेतलेल्या कामांमुळे नागरिकांमध्ये विश्वास दृढ झाला आहे. चाळीसगावचा सर्वांगीण विकास केवळ भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच शक्य आहे, हे विविध समाजघटकांनी मान्य केले आहे, हा माझ्या कार्याचा सर्वात मोठा सन्मान आहे.”

सभेला सिंधी समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक, पदाधिकारी, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचे म्हणणे, “चाळीसगावच्या भविष्यासाठी स्थिर नेतृत्व आणि सातत्यपूर्ण विकासाची गरज आहे, आणि तो विश्वास आम्हाला फक्त आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यात दिसतो.”
आपल्या भावना व्यक्त करताना आमदार चव्हाण पुढे म्हणाले, “तुमचा हा अमाप विश्वास माझ्यावरची जबाबदारी अधिक वाढवणारा आहे. हा माझ्या राजकीय प्रवासातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. चाळीसगावच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी अधिक जोमाने, निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कार्य करीत राहीन.”
सभेच्या अखेरीस सिंधी समाजाच्या घोषणांनी भाजप उमेदवारांच्या समर्थनाचा नवा उत्साह निर्माण झाला असून, चाळीसगावच्या राजकारणात ही सभा एक निर्णायक क्षण म्हणून नोंदवली जात आहे.









