वाहतूक खोळंबली; ठिबक सिंचनाच्या नळ्या रस्त्यावर
मध्यप्रदेशातून धुळ्याकडे जात होता ट्रक
ट्रक क्रमांक (एमपी १२ एच ०६६२) हा मध्यप्रदेशातून ठिबक सिंचनाच्या नळ्यांचे बंडल घेऊन धुळ्याकडे जात होता. जळगाव शहरापासून जवळ असलेल्या पाळधी ते तरसोद बायपास चौपदरीकरण रस्त्यावर कचरा डेपोजवळ ट्रक आला असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला.
चालक-क्लिनर किरकोळ जखमी
अपघाताची तीव्रता जास्त नसल्याने सुदैवाने ट्रक चालक आणि क्लिनर किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यात आली आहे.
ट्रक थेट रस्त्याच्या मध्यभागी कलंडल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक त्वरित थांबली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, पोलीस परिस्थिती हाताळत होते आणि क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रक बाजूला करून महामार्ग पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.









