जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी ) – शहरातील दिक्षीतवाडी परिसरातून एक धक्कादायक चोरीची घटना उघडकीस आली आहे. तुकाराम वाडी येथील एका नागरिकाची कार (क्रमांक MH 19 CU 4422) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लांबवली. नेहमीप्रमाणे पार्किंग केलेल्या ठिकाणाहून कार गायब झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
तुकारामवाडी परिसरात राहणारे सचिन शंकर चौधरी (वय ३६) यांनी आपली हुंडाई आय-२० कार नेहमीप्रमाणे व्यायामशाळेजवळील पटांगणाच्या मोकळ्या जागेत, एका स्पेअर पार्ट दुकानासमोर रात्री पार्क केली होती. सकाळी उठून पाहिल्यावर त्यांना कार जागेवर दिसली नाही.
शोध घेऊनही कार जागेवर नसल्याचे लक्षात येताच चौधरी यांनी संपूर्ण परिसरात आणि आजूबाजूला कसून शोध घेतला. तसेच, परिसरातील लोकांकडे चौकशी केली, परंतु कारचा कोणताही थांगपत्ता लागला नाही.
अखेर सचिन चौधरी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेल्या प्रकाराची सविस्तर तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.









