धुळे येथील महिलेविरुद्ध गुन्हा दाखल!
जळगाव (प्रतिनिधी ) – राष्ट्रीय महामार्ग ६ च्या चौपदरीकरणासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनाच्या मोबदल्यातील तब्बल १६ लाख ९७ हजार रुपयांवर डल्ला मारल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मूळ जमीन मालकिणीच्या नावाचे साम्य साधून एका ५८ वर्षीय महिलेने शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
नायब तहसीलदार विकास लाडवंजारी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात पुष्पा देवराम जावळे (वय ५८, रा. अंबिका सोसायटी, धुळे) या संशयित महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील गट क्रमांक २२०६ मधील ४८८ चौ.मी. जमीन ही मूळ मालक पुष्पा देवराम जावळे (वय ७०, रा. भुसावळ) यांच्या नावावर होती. २०११ आणि २०१३ मध्ये भूसंपादन झाले असल्याने त्यांना १६.९७ लाख रुपयांचा मोबदला मिळणे अपेक्षित होते.
मात्र, दि. २१ ऑगस्ट २०१८ रोजी धुळे येथील त्याच नावाच्या महिलेने उपविभागीय अधिकारी कार्यालयात स्वतःला जमीनमालक भासवत मोबदला मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे, २३ ऑगस्ट २०१८ रोजी या तोतया महिलेच्या ॲक्सिस बँक खात्यात आरटीजीएसद्वारे १६ लाख ९७ हजार रुपये जमा देखील करण्यात आले.
मूळ मालकाच्या अर्जानंतर घोटाळा उघड
दि. २८ ऑगस्ट २०१९ रोजी मूळ मालक पुष्पा जावळे (भुसावळ) यांनी जेव्हा भूसंपादन मोबदल्यासाठी अर्ज दाखल केला, तेव्हा प्रशासनाच्या ही संशयास्पद बाब लक्षात आली. तत्कालीन उपविभागीय अधिकारी दिपमाला चौरे यांनी याप्रकरणी तातडीने चौकशी सुरू केली.
पडताळणीत असे स्पष्ट झाले की, धुळे येथील महिलेने सादर केलेली कागदपत्रे खोटी होती आणि ती जमीनमालक नसतानाही तिने नावसाम्याचा गैरफायदा घेत बनावट कागदपत्रे सादर करून मोबदला मिळवला होता. प्रशासनाने संबंधित महिलेचा पत्ता शोधण्यासाठी बँकेसह विविध मार्गांनी चौकशी केली, परंतु ती निष्पन्न झाली नाही.
अखेरीस, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदारांनी धुळे येथील या बनावट लाभार्थीविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. एकाच नावाचा गैरफायदा घेऊन बनावट कागदपत्रे आणि खोट्या खात्याद्वारे शासकीय मोबदल्याची लाखो रुपयांची फसवणूक केल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास जिल्हापेठ पोलीस करत आहेत.









