चालक फरार; एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव-जामनेर मार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या एका पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने गाडेगाव (ता. जामनेर) येथील मनोज त्र्यंबक शिरसाळे (वय ५३) यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुधवारी, १९ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ही हृदयद्रावक घटना घडली.
अपघातानंतर पिकअप चालक वाहन सोडून पसार झाला असून, रुग्णालयात मनोज शिरसाळे यांच्या पत्नीसह नातेवाईकांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मनोज शिरसाळे हे गाडेगाव येथे पत्नी व तीन मुलांसह वास्तव्याला होते आणि सुप्रीम कंपनीत कंत्राटी पद्धतीने नोकरी करत होते. घटनेच्या दिवशी, गुरुवारी (१९ नोव्हेंबर) दुपारी ते एका खासगी कामासाठी नेरी गावात गेले होते. काम आटोपून ते रात्री ८ वाजेच्या सुमारास घरी परतण्यासाठी नेरी येथील महामार्गावर उभे होते.
यावेळी, जळगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू पिकअप क्रमांक (एमएच १९ सीएक्स १०६८) ने मनोज शिरसाळे यांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर वाहनचालक पिकअपसह घटनास्थळावरून पळून गेला. हे पाहून तेथील काही संतप्त तरुणांनी तातडीने त्याचा पाठलाग सुरू केला. तरुणांचा पाठलाग सुरू असतानाच, रस्त्यावरील उमाळे फाट्याजवळ चालकाने वाहन थांबवले आणि ते लॉक करून अंधाराचा फायदा घेत पळ काढला.
दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या मनोज शिरसाळे यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
मनोज शिरसाळे यांच्या मृत्यूची बातमी कळताच, त्यांच्या पत्नीसह कुटुंबीय आणि नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात एकच आक्रोश केला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गाडेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
फरार चालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. सध्या याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत.









