जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील कडगाव येथे १६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी करून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ६२ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. याच रात्री अन्य दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला. या घटनेमुळे संपूर्ण गावात दहशत पसरली असून, या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांनी सर्वप्रथम कडगाव येथील ६३ वर्षीय किरण मोतीराम पाटील यांचे बंद घर फोडले. दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केलेल्या चोरट्यांनी सुरुवातीला सोन्याचे लॉकेट २० हजार, सोन्याची अंगठी १० हजार , सोनपोत ६ हजार रुपये रोख रक्कम ७ हजार असा एकूण ४३ हजार रुपये लुटले.
याच रात्री, गावातील दुसरे घर विशाल रामदास कोल्हे यांचे फोडण्यात आले. त्यांच्या घरातून चोरट्यांनी १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे ‘टोंगल’ (दागिना) आणि रोख १५ हजार रुपये असा एकूण २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
त्याच रात्री कडगाव येथील सुधाकर रामदास पाटील आणि रवींद्र श्रीधर पाटील यांच्या बंद घरातही चोरीचा प्रयत्न केला. मात्र, काही कारणास्तव या दोन्ही ठिकाणी चोरट्यांचा प्रयत्न फसला. एकाच रात्री चार घरांना लक्ष्य केल्याने कडगावच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या सर्व घटनांसंदर्भात किरण पाटील यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंविच्या कलम ४५७, ३८० आणि ५११ नुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.









